नागपुरातील वैशालीनगरात शस्त्रधारी टोळीचा हैदोस; दुकान फोडून रोकड पळवली, विद्यार्थ्यावरही हल्ला

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगर परिसरात शस्त्रधारी टोळीने दहशत माजवत दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या दुकानाची तोडफोड करून रोकड लुटल्याची घटना घडली. या घटनेदरम्यान दुकानात दूध घेण्यासाठी आलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यावरही आरोपींनी हल्ला केला. संपूर्ण प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

वैशालीनगर येथील प्रदीप वर्मा यांच्या दुकानात रात्रीच्या वेळी चार ते पाच जण अचानक घुसले. हातात शस्त्रे असल्याने त्यांनी दुकानात दहशत निर्माण केली. शिवीगाळ करत आरोपींनी दुकानातील साहित्याची नासधूस करण्यास सुरुवात केली.

याच वेळी वेदांत नावाचा महाविद्यालयीन विद्यार्थी दूध घेण्यासाठी दुकानात आला. आरोपींनी त्याला लक्ष्य करत मारहाण केली. या हल्ल्यात त्याच्या डोक्याला दुखापत झाली.

त्यानंतर आरोपींनी दुकानातील गल्ला लुटून त्यातील रोकड घेऊन घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकारामुळे परिसरातील व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कार्यरत आहेत. दुकानदार प्रदीप वर्मा यांनी आरोपींवर कठोर कारवाई करून परिसरातील नागरिकांना सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.