रामगिरी महाराजांना धमकी देणाऱ्यांना फडणवीसांचा इशारा; शेतकरी कर्जमाफीवरही मोठं वक्तव्य

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नगर : सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांना मिळणाऱ्या कथित जीवे मारण्याच्या धमक्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. धमक्या देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सरकार खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. “धमकी देण्याचं काम केलं तर नेस्तनाबूत करून टाकू,” असं फडणवीस म्हणाले.

श्री संत सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमात फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी महाराष्ट्राची संत परंपरा, वारकरी संप्रदाय, सरला बेटाचा विकास आणि शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजनांवर भाष्य केलं.

संत परंपरेमुळे समाजाची एकजूट कायम-
भारतीय संस्कृतीवर अनेक आक्रमणं झाली, मात्र देशाची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख कायम राहिली, असं मुख्यमंत्री म्हणाले. वारकरी संप्रदाय आणि हरिनाम सप्ताहामुळे समाजातील विविध घटक एकत्र येतात. जाती-पातीच्या भेदांपेक्षा माणुसकी आणि भक्तीला महत्त्व देण्याची शिकवण या परंपरेतून मिळते, असं त्यांनी नमूद केलं.

हरिनामाचा गजर आणि संतांची परंपरा कोणत्याही परिस्थितीत थांबवता आली नाही, असंही फडणवीस यांनी सांगितलं.

सरला बेटाच्या विकासाला सरकारचा पाठिंबा-
महंत रामगिरी महाराज यांच्या कार्याचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. सरला बेट हे आध्यात्मिक आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण असल्याचं सांगत त्याच्या विकासासाठी सरकार प्रयत्न करत राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

सरला बेट परिसरात रस्ते, सभागृह आणि पूर संरक्षणासह विविध विकासकामं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. आगामी काळात नियोजित विकास आराखड्याच्या माध्यमातून सरला बेटाचा आणखी विस्तार केला जाईल आणि ते राज्यातील भाविकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा दावा-
मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरही सरकारची भूमिका मांडली. कर्जमाफी केवळ कागदावर न ठेवता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्यक्ष रक्कम जमा केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.

आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचा दावा त्यांनी केला. दर पंधरा दिवसांनी लाभार्थ्यांची नवीन यादी तयार करून रक्कम वितरित केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारने एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं उद्दिष्ट ठेवल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं.

दिवसा वीजपुरवठ्यावर भर-
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासोबतच दिवसा वीज उपलब्ध करून देण्यावर सरकारचा भर असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. सध्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिवसा वीज दिली जात असून टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा पुरवठा पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या थकीत वीजबिलांबाबतही सरकारने वसुली न करण्याची भूमिका घेतल्याचं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

केसालाही धक्का लागू देणार नाही-
महंत रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांवर बोलताना फडणवीस यांनी सरकार त्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर असल्याचं स्पष्ट केलं. धमकीच्या माध्यमातून कोणालाही दहशत निर्माण करता येणार नाही, असा संदेश त्यांनी दिला.

“आम्ही केसालाही धक्का लागू देणार नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांच्या सुरक्षेबाबत ठाम भूमिका मांडली. त्यांच्या या आक्रमक वक्तव्याची सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू आहे.