गोळीबार अन् लाठीचार्ज झाला,18 दिवस तुरुंगात होतो; फडणवीसांनी सांगितला अयोध्या आंदोलनाचा अनुभव

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जेन-झी पिढीतील तरुणांशी संवाद साधताना आपल्या तरुणपणीच्या आंदोलनाच्या आठवणी सांगितल्या. राजकारणात प्रवेश करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना त्यांनी जम्मू-काश्मीरमधील तिरंगा आंदोलन आणि रामजन्मभूमी आंदोलनातील आपल्या सहभागाचे अनुभव तरुणांसमोर मांडले. यावेळी अयोध्येतील आंदोलनादरम्यान झालेला गोळीबार, लाठीचार्ज आणि 18 दिवसांचा तुरुंगवास यांचा विशेष उल्लेख त्यांनी केला.

फडणवीस म्हणाले की, “राजकारण हा माझा व्यवसाय नाही, तर माझे मिशन आहे. सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी राजकारण हे माध्यम आहे.” विद्यार्थी दशेतच राजकारण आणि सामाजिक चळवळींमध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.

18व्या वर्षी लाल चौकाच्या आंदोलनात सहभाग-
वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमधील आंदोलनात सहभागी झाल्याची आठवण फडणवीस यांनी सांगितली. श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवण्याचा निर्धार करण्यात आला होता. त्यासाठी सुमारे 10 हजार तरुण जम्मूला गेले होते. उधमपूरनंतर श्रीनगरकडे जात असताना सुरक्षा दलांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन दिल्लीला आणण्यात आले.

1992 मध्ये मुरली मनोहर जोशी आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लाल चौकात तिरंगा फडकवण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी केला.

अयोध्येत पहिल्यांदा गोळीबार पाहिला-

रामजन्मभूमी आंदोलनातील अनुभव सांगताना फडणवीस यांनी त्या काळातील परिस्थितीचे वर्णन केले. “मी 20 वर्षांचा असताना प्रयागराजला गेलो आणि तेथून अयोध्येला पोहोचलो. तिथे पहिल्यांदा गोळीबार पाहिला. आमच्यावर गोळीबार झाला, लाठीचार्ज झाला आणि आम्हाला ताब्यात घेण्यात आले,” असे त्यांनी सांगितले.

ताब्यात घेतल्यानंतर 18 दिवस सेंट्रल जेलमध्ये राहावे लागल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आंदोलन थांबवले नाही, तर पुन्हा त्याच आंदोलनात सहभागी झाल्याचे त्यांनी नमूद केले.

1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली, त्यावेळी आपण अयोध्येत उपस्थित होतो, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्या घटनेचा आपल्याला अभिमान असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

तरुणांना स्टार्टअप्सची संधी-

संवादादरम्यान फडणवीस यांनी तरुणांच्या उद्योजकतेवरही भर दिला. स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र निधी तयार केला असून, नव्या उद्योजकांना सरकारकडून आवश्यक सहकार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांनी केवळ नोकरीच्या संधी शोधण्याऐवजी नव्या कल्पनांवर काम करून रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनावे, असा संदेशही या संवादातून देण्यात आला.