मराठी न येणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांना दिलासा; परवाना रद्द होणार नसल्याचे फडणवीसांचे स्पष्ट वक्तव्य

    25-Aug-2026
Total Views |
 
CM Fadnavis
 Image Source:(Internet)
 
मुंबई : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीचे प्राथमिक ज्ञान असणे बंधनकारक करण्याच्या निर्णयावरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Fadnavis) यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. केवळ मराठी बोलता येत नाही म्हणून कोणत्याही चालकाचा परवाना रद्द केला जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चालकांनी मराठी भाषेचे तज्ज्ञ व्हावे किंवा अस्खलित मराठी बोलावी, अशी सरकारची अट नाही. प्रवाशांशी दैनंदिन व्यवहार करताना संवाद साधता यावा, यासाठी आवश्यक तेवढे प्राथमिक मराठीचे ज्ञान असावे, एवढीच सरकारची अपेक्षा आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
मराठी शिकण्यासाठी चालकांना पुरेसा वेळ देण्यात आला असून, आवश्यक असल्यास आणखी वेळ देण्याची सरकारची तयारी आहे. महाराष्ट्रात रोजगारासाठी राहणाऱ्या व्यक्तींनी स्थानिक भाषेचे प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे ही अवाजवी अपेक्षा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, काही अमराठी रिक्षाचालकांनी मराठीच्या सक्तीविरोधात नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे. वय आणि शिक्षणाचा अभाव यामुळे मराठी शिकणे कठीण जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच मराठी न बोलल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारला जात असल्याचा आरोपही काही चालकांनी केला आहे.
या आरोपांची दखल घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी बेकायदेशीरपणे दंड आकारला जात असल्यास प्रशासनाकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे भाषेच्या मुद्द्यावरून चालकांवर अन्याय होणार नसून, प्राथमिक मराठीचे ज्ञान हा सरकारचा मुख्य आग्रह असल्याचे स्पष्ट झाले आहे.