कांदा दरवाढीला केंद्राचा लगाम; 35 रुपये किलोने मिळणार स्वस्त कांदा

    25-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : कांद्याच्या वाढत्या दरामुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य ग्राहकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. देशातील काही बाजारपेठांमध्ये कांद्याचा भाव 60 ते 70 रुपये किलोपर्यंत पोहोचल्यानंतर सरकारने बफर स्टॉकमधील कांदा स्वस्त दरात विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांना आता 35 रुपये किलो दराने कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे.

कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी नाशिकमधून सरकारी बफर स्टॉकमधील कांदा विशेष मालगाड्यांच्या माध्यमातून देशातील विविध भागांत पाठवला जात आहे. या ‘कांदा एक्सप्रेस’द्वारे चेन्नई, मदुराई, कोच्ची आणि गुवाहाटी यांसारख्या शहरांमध्ये कांद्याचा पुरवठा करण्यात येत आहे. याशिवाय 800 टनांहून अधिक कांद्याची आणखी एक खेप दिल्लीसह उत्तर भारतातील प्रमुख शहरांकडे रवाना केली जाणार आहे.

कुठे मिळणार 35 रुपये किलो कांदा?

सरकारने स्वस्त कांदा ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी NAFED, NCCF आणि केंद्रीय भंडार यांसारख्या संस्थांकडे सोपवली आहे. ग्राहकांना या संस्थांच्या विक्री केंद्रांमधून कांदा खरेदी करता येणार आहे. तसेच NAFED आणि NCCFच्या मोबाइल व्हॅन तसेच ‘भारत ब्रँड’च्या आउटलेट्सवरही 35 रुपये किलो दराने कांदा विक्री केला जाणार आहे.

दर नियंत्रणात आणण्याचा सरकारचा प्रयत्न-

पावसामुळे पिकाचे झालेले नुकसान आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी यामुळे कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने बफर स्टॉकमधील कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. बाजारात स्वस्त कांद्याचा पुरवठा वाढल्याने दरवाढीवर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल, तसेच साठेबाजीला आळा बसण्याची शक्यता आहे.

या निर्णयामुळे कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झालेल्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.