नागपुरात कत्तलीसाठी गोवंश चोरी; तिघांच्या मुसक्या आवळल्या

    24-Aug-2026
Total Views |
गाय, कार, धारदार चाकूंसह ५ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Theft of cattle
 Image Source:(Internet)
 
नागपूर : कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची (Cattle) चोरी करून त्याची कत्तल करण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना यशोधरानगर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. पोलिसांनी आरोपींकडून गाय, चारचाकी वाहन, धारदार चाकू आणि दोन भ्रमणध्वनी असा सुमारे ५ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांना संगमनगर परिसरातील अनाफ फर्निचरच्या मागील बाजूस नाल्याजवळ एका गायीला कत्तलीसाठी बांधून ठेवल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी तीन जण गायीला बांधून कत्तलीची तयारी करताना आढळले. पोलिसांनी कारवाई करत गायीची सुटका केली आणि तिघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी ही गाय एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर चारचाकी वाहनातून गाय यशोधरानगर परिसरात आणण्यात आली होती. गायीची कत्तल करून मांस विक्रीतून मिळणारी रक्कम आपापसांत वाटून घेण्याचा त्यांचा कट असल्याचे तपासात समोर आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अल्फाज अहमद ऊर्फ सोबी अन्सारी, समीर अहमद कुरेशी आणि शेख शाहरुख अशी आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे २५ हजार रुपये किमतीची गाय, ५ लाख रुपये किमतीची हुंडाई कार, धारदार चाकू आणि दोन भ्रमणध्वनी जप्त केले आहेत.
याप्रकरणी यशोधरानगर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.