Image Source:(Internet)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित ‘चहावाला’ प्रवासावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा सादर करावा, अन्यथा आपण राजकारण सोडू, असे थेट आव्हान राऊत यांनी दिले.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, नरेंद्र मोदी ज्या रेल्वे स्थानकावर लहानपणी चहा विकत असल्याचा दावा करतात, त्या काळात संबंधित रेल्वे स्थानक अस्तित्वातच नव्हते. त्यामुळे मोदींनी चहा विकल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप त्यांनी केला. “मोदींनी लहानपणी चहा विकल्याचा पुरावा कोणी आणून दिला, तर मी राजकारण सोडेन,” असे राऊत म्हणाले.
मोदी स्वतःला ‘नॉन-बायोलॉजिकल’ म्हणवतात, मग ते शाळेत कसे गेले आणि चहा कसा विकला, असा उपरोधिक सवालही राऊत यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी निशाणा साधत, “फडणवीस पुन्हा खोटे बोलत आहेत,” असा आरोप केला.
फडणवीसांवरही राऊतांचा हल्लाबोल-
सामान्य कुटुंबातून सत्तेच्या सर्वोच्च पदावर पोहोचलेल्या नेत्यांनी महाराष्ट्राचे आभार मानले पाहिजेत, असे सांगत राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली. महाराष्ट्रात धर्म आणि जातीच्या नावावर भेद निर्माण करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत ते म्हणाले की, सामान्य कुटुंबातून आलेला माणूस द्वेष आणि सुडाच्या भावनेने वागत नाही.
महिला आरक्षणावरून भाजपला सवाल-
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राऊत यांनी भाजप, नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली. २०२३ मध्ये संसदेत महिला आरक्षणासंदर्भातील १०६वी घटनादुरुस्ती मंजूर झाली असताना त्याच मुद्द्यावर पुन्हा विधेयक आणण्याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केला.
“२०२३ सालचे विधेयक पुन्हा आणून तुम्ही कोणाला मूर्ख बनवत आहात? एकच विधेयक दोनदा कसे जाहीर होणार?” असा सवाल राऊत यांनी केला. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीला जनगणना आणि मतदारसंघ पुनर्रचनेशी जोडल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका केली असून, काँग्रेसने महिला आरक्षण विधेयकाला विरोध केल्याचा आरोप केला आहे.
रॅपिडोमुळे रिक्षाचालक संकटात-
रॅपिडो, ओला आणि उबरसारख्या अॅप-आधारित प्रवासी सेवांमुळे पारंपरिक रिक्षाचालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मुद्दाही राऊत यांनी उपस्थित केला. राज्यातील हजारो रिक्षाचालक मराठी असून, अशा सेवांमुळे त्यांचा व्यवसाय संकटात आला असल्याचे त्यांनी म्हटले.
या प्रश्नावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिल्याचे राऊत यांनी सांगितले. रिक्षाचालकांच्या प्रतिनिधींशी चर्चा करूनच अशा प्रवासी सेवांना परवानगी देण्याची भूमिका त्यांनी मांडली.
राऊत यांच्या या वक्तव्यामुळे मोदींच्या ‘चहावाला’ प्रतिमेपासून महिला आरक्षण आणि अॅप-आधारित प्रवासी सेवांपर्यंत विविध मुद्द्यांवर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.