
Image Source:(Internet)
अमरावती : जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे भीषण आग लागल्याने तीन नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनासह पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पहाटे साडेतीनच्या सुमारास नवजात बालकांवर उपचार सुरू असलेल्या विभागात अचानक आग भडकली. धूर आणि आगीचे लोट दिसताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. विभागातील इतर बालकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. मात्र, तीन बालकांना वाचवता आले नाही.
या विभागात मुदतपूर्व जन्मलेली, कमी वजनाची तसेच गंभीर प्रकृतीची सुमारे ५० ते ६० बालके उपचार घेत होती. आग लागण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपासात विद्युत बिघाडाचा संशय व्यक्त केला जात असून, कृत्रिम श्वसन यंत्राचा स्फोट झाल्याने आग लागल्याची शक्यताही तपासली जात आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेनंतर काही बालकांना तातडीने इतर रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. चार बालकांवर उपचार सुरू असून, त्यापैकी एका बालकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्या हाताला आणि पायाला भाजलेल्या जखमा झाल्या आहेत. अन्य तीन बालकांना किरकोळ भाजल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि आपत्कालीन पथकांनी रुग्णालयात धाव घेतली. आगीचे नेमके कारण, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी तसेच दुर्घटनेतील नुकसानीचा तपशील चौकशीनंतर समोर येणार आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.