नागपूरच्या कोराडीत बाथरूमच्या खिडकीतून भ्रूण फेकला; २२ वर्षीय युवतीविरुद्ध गुन्हा दाखल

    24-Aug-2026
Total Views |
 
fetus thrown
 Image Source:(Internet)
 
नागपूर : कोराडी (Koradi) पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन महिन्यांच्या गर्भवती २२ वर्षीय अविवाहित युवतीचा गर्भपात झाल्यानंतर तिने घाबरून भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोराडी पोलिसांनी भ्रूणाची योग्य विल्हेवाट न लावल्याप्रकरणी युवतीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, युवती सकाळी आईसोबत बाहेर गेली होती. घरी परतल्यानंतर काही वेळातच तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदना असह्य झाल्याने ती बाथरूममध्ये गेली. त्याचदरम्यान तिचा गर्भपात झाला. या घटनेनंतर ती घाबरली आणि कुटुंबीयांना माहिती मिळेल या भीतीने तिने भ्रूण बाथरूमच्या खिडकीतून बाहेर फेकल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.
युवती एका युवकाच्या संपर्कात असून ती सुमारे तीन महिन्यांची गर्भवती होती. मात्र, तिने गर्भावस्थेची माहिती कुटुंबीयांपासून लपवून ठेवली होती. गर्भपात झाल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत तिने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच कोराडी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक माहिती गोळा केली. त्यानंतर युवतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गर्भपात नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, तो नैसर्गिक होता की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, तसेच संबंधित युवकाची भूमिका काय आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय तपासणी व अहवालानंतर या प्रकरणातील अधिक तथ्य स्पष्ट होणार आहेत. पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत.