गोधनी गॅस गळतीतील बाधितांवर तातडीने उपचार;जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती

    24-Aug-2026
Total Views |
 
Godhani
 Image Source:(Internet)
 
नागपूर : गोधनी (Godhani) ग्रामपंचायत परिसरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण केंद्रात सोमवारी पहाटे क्लोरीन गॅसची गळती झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. गॅसचा त्रास जाणवू लागल्यानंतर प्रशासनाने तातडीने बचाव व वैद्यकीय यंत्रणा सक्रिय करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
 
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तातडीने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क केले. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी रवाना करण्यात आले. पथकाने तांत्रिक उपाययोजना आणि बचावकार्य हाती घेतल्याने संभाव्य मोठा धोका टळला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनेची माहिती घेत जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बाधित नागरिकांच्या उपचारात कोणतीही कमतरता राहू नये, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
 
जलशुद्धीकरण केंद्रातील दोन क्लोरीन सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून गॅसची गळती झाल्याचे निदर्शनास आले. गळती होत असलेला सिलेंडर पूर्णपणे पाण्यात बुडवून ठेवण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे.
 
आरोग्य संचालनालय, औद्योगिक सुरक्षा विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय साधत उपाययोजना केल्या. गॅस गळतीमुळे आतापर्यंत ५६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी ११ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ४५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. यातील ८ जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
 
दरम्यान, रुग्णालय प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या पथकांकडून परिसरातील नागरिकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. प्रशासनाच्या तत्पर कारवाईमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली असून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.