
Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर : मुलाला आत्महत्येपासून रोखण्यासाठी डोंगरावर पोहोचलेल्या आई-वडिलांवरच काळाने घाला घातला. मुलाने डोंगरावरून उडी घेतल्यानंतर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही तोल गेला. दोघेही दरीत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे दृश्य पाहून हादरलेल्या आईनेही डोंगरावरून उडी घेतल्याने तिचाही जीव गेला. तिसगाव परिसरातील खवड्या डोंगरावर शुक्रवारी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
मृतांमध्ये कुणाल मुरलीधर चांदवडे (१८), मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे यांचा समावेश आहे. हे कुटुंब देवळाई-सातारा परिसरातील असल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल सकाळी सुमारे १० वाजता खवड्या डोंगरावर गेला होता. तो डोंगरावरून उडी घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्याचे आई-वडील घटनास्थळी पोहोचले. स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवानही तातडीने तेथे दाखल झाले.
कुणालने टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी आई-वडील आणि उपस्थित नागरिक त्याची समजूत काढत होते. मात्र, कुणाल कोणाचेही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. वडिलांनी त्याला पकडण्यासाठी पुढे जाताच कुणालने अचानक खाली उडी घेतली. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात मुरलीधर यांचाही तोल गेला आणि दोघेही डोंगराच्या दरीत कोसळले. उंचावरून खाली पडल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.
मुलगा आणि पती डोळ्यांसमोर दरीत कोसळल्याने संगीता यांना मोठा धक्का बसला. या घटनेनंतर त्यांनीही डोंगरावरून खाली उडी घेतली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे घटनास्थळी उपस्थित नागरिकांनाही मोठा धक्का बसला. कुणालने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.