हरवलेली नवजात आईच्या कुशीत; नागपूर पोलिसांच्या तत्परतेने काही तासांत बालिकेचा शोध

    22-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या अवघ्या एक दिवसाच्या नवजात बालिकेचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोध घेतला. तहसील आणि यशोधरानगर पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत यशोधरानगर परिसरातून बालिकेला सुरक्षित ताब्यात घेतले. त्यानंतर बालिकेला तिच्या आईकडे सोपवण्यात आले.

२० ऑगस्ट रोजी गोळीबार चौक परिसरातील प्रभा शक्ती पाठराबे यांनी बालिकेला जन्म दिला होता. शुक्रवारी सकाळी बालिका तिची आजी मीना खळतकर यांच्याजवळ होती. त्यावेळी बुरखा घातलेली एक महिला रुग्णालयात आली. बालिकेचे लसीकरण करून आणण्याचे सांगत तिने आजीची दिशाभूल केली. सरकारी योजनेतून आर्थिक मदत आणि साहित्य मिळवून देण्याचेही आमिष तिने दाखवले.

महिलेने बालिकेला सोबत नेल्यानंतर बराच वेळ उलटला तरी ती परतली नाही. संशय आल्याने कुटुंबीयांनी रुग्णालयातील डॉक्टरांकडे चौकशी केली. मात्र, त्या वेळी कोणतेही लसीकरण सुरू नसल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच रुग्णालय प्रशासनाने तहसील पोलिसांना कळवले.

पोलिसांनी तातडीने रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यातून संशयित महिलेचा माग काढत तपासाचे चक्र वेगाने फिरवण्यात आले. अखेर तिचे ठिकाण यशोधरानगर येथील टिपू सुल्तान चौक परिसरात असल्याचे समोर आले. पोलिसांनी तेथे कारवाई करून आशियाना अंजुम सैयद अल्ताफ हिला ताब्यात घेतले. तिचा भाऊ मोहम्मद शोएब याचीही चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, बालिकेला सुखरूप ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी तिची आईकडे रवानगी केली. बालिका पुन्हा आईच्या कुशीत पोहोचल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. संशयित महिलेची प्रकृती अचानक बिघडल्याने तिला मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात संशयित महिलेच्या मुलीचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर नवजात बालिकेला रुग्णालयातून नेण्यामागील नेमका हेतू काय होता, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.