नागपुरात पाणीप्रश्नावरून महासभेत रणकंदन; दूषित पाणी अन् वाढीव बिलांवर नगरसेवकांचा संताप

    21-Aug-2026
Total Views |
ओसीडब्ल्यूच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; महापौर नीता ठाकरे यांनी तक्रारी सोडविण्याचे दिले निर्देश

Image Source:(Internet)

नागपूर : नागपूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न महापालिकेच्या महासभेत चांगलाच तापला. दूषित पाणीपुरवठा, अनियमित पाणी आणि अवाजवी पाणीबिलांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने ओसीडब्ल्यूच्या कारभारावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली.

पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नगरसेवकांनी केली. यानंतर महापौर नीता ठाकरे यांनी नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण करण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.

दरम्यान, अंबाझरी तलावातील जलपर्णी हटविण्यात आल्याने महापालिकेने समाधान व्यक्त केले. नागपूरच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी अंबाझरी तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

याचवेळी नागपुरातील विविध भागांत पावसाचे पाणी साचणे, सिमेंट रस्त्यांची कामे आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दाही गाजला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी या प्रश्नांवरून प्रशासनाला धारेवर धरत नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली.