
Image Source:(Internet)
नागपूर : सणासुदीच्या काळात साखरेच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत किरकोळ बाजारात साखरेचा दर ७० रुपयांच्या पुढे गेला असून, वाशिम, बुलढाणा आणि सांगलीत तो तब्बल ८० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. घाऊक बाजारातही साखरेचा दर प्रतिक्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढला आहे.
मराठवाड्यात साखरेचा दर ७५ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरवाढीमुळे मिठाई, पेढे, बर्फी आणि लाडू तयार करणाऱ्या व्यावसायिकांचा उत्पादन खर्च वाढला असून, त्याचा परिणाम आगामी काळात मिठाईच्या किमतीवर होण्याची शक्यता आहे.
विदर्भातील बाजारपेठांमध्येही साखरेचे दर वाढले आहेत. अमरावतीत ७५ रुपये, यवतमाळमध्ये ७५ ते ७८ रुपये, नागपूर आणि भंडाऱ्यात ६८ ते ७० रुपये, तर गोंदियात ७० रुपये किलो दर आहे. वर्ध्यात ६२ ते ६४ रुपये, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीत साखर सुमारे ६० रुपये किलो दराने विकली जात आहे.
मुंबईत साखरेचा दर ६० ते ६५ रुपये, पुण्यात ७२ रुपये, नाशिक आणि कोल्हापुरात ७५ रुपये, तर सांगलीत ८० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या दरवाढीचा परिणाम चहा, हॉटेल, बेकरी आणि मिठाई व्यवसायावरही होण्याची शक्यता असून, उत्पादन खर्च वाढल्यास त्याचा भार थेट ग्राहकांच्या खिशावर पडू शकतो.