तुरुंगातच संपला सज्जन कुमार यांचा प्रवास; 1984 दंगलीतील दोषी काँग्रेस नेत्याचे निधन

    21-Aug-2026
Total Views |
 
Sajjan Kumar
 Image Source:(Internet)
 
नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलीतील प्रकरणांमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार (Sajjan Kumar) यांचे गुरुवारी निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात आणण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रुग्णालयातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
 
तिहारमध्ये भोगत होते जन्मठेप-
सज्जन कुमार हे 1984 च्या शीखविरोधी दंगलीशी संबंधित दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरले होते. या प्रकरणांमध्ये त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती आणि ते तिहार तुरुंगात शिक्षा भोगत होते.
 
1984 मधील हिंसाचारानंतर सज्जन कुमार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप झाले. दिल्लीतील राजनगर परिसरात पाच शीखांच्या हत्या झाल्याच्या प्रकरणात सुरुवातीला कनिष्ठ न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. मात्र, या निर्णयाला आव्हान दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 मध्ये कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बदलत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
 
आणखी एका प्रकरणातही जन्मठेप-
2025 मध्ये सज्जन कुमार यांना 1984 च्या दंगलीशी संबंधित आणखी एका हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते. या प्रकरणातही न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे त्यांच्या विरोधातील दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये जन्मठेप कायम होती.
 
एका प्रकरणात मात्र निर्दोष मुक्तता-
दरम्यान, जानेवारी 2026 मध्ये जनकपुरी आणि विकासपुरी परिसरातील 1984 च्या हिंसाचाराशी संबंधित एका प्रकरणात दिल्लीतील न्यायालयाने सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता केली होती. त्यांच्याविरोधातील आरोप सिद्ध करण्यासाठी पुरेसे विश्वसनीय पुरावे नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.
 
मात्र, या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतरही इतर दोन प्रकरणांतील जन्मठेपेच्या शिक्षेमुळे सज्जन कुमार तुरुंगाबाहेर येऊ शकले नव्हते.
 
राजकीय कारकिर्दीवर दंगलींची कायम सावली-
सज्जन कुमार हे काँग्रेसचे प्रभावशाली नेते आणि माजी खासदार होते. 1984 च्या दंगलीतील दोषसिद्धीनंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठा परिणाम झाला. दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 मध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
 
गुरुवारी त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर 1984 च्या दंगलीशी संबंधित त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन आणि राजकीय प्रवासाचा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.