नागपुरातील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी; दुचाकी घसरून बसखाली आली

    21-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: कामठी मार्गावर रस्त्यावरील खड्ड्यामुळे झालेल्या भीषण अपघातात २८ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायोना पब्लिक स्कूलजवळ शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

मृत महिलेचे नाव अंजली रविशंकर पांडे असून त्या कलमना येथील वैष्णोदेवी नगर परिसरात राहत होत्या. जरीपटका भागातील सौंदर्य प्रसाधन केंद्रात त्या काम करत होत्या. नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे १० वाजता त्या इलेक्ट्रिक दुचाकीवरून कामासाठी निघाल्या होत्या.

सायोना पब्लिक स्कूलसमोर रस्त्यावर आलेल्या खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी अचानक उसळली. वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली आणि अंजली रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्याचवेळी मागून येणाऱ्या महापालिकेच्या इलेक्ट्रिक बसखाली त्या आल्या. या दुर्घटनेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताच्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. एका बाजूचा रस्ता बंद असल्यामुळे दोन्ही दिशांची वाहतूक एकाच मार्गावरून सुरू होती. त्यातच रस्त्यावर असलेल्या खड्ड्यामुळे हा भीषण अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच कपिल नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महापालिकेच्या बसचालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचा सविस्तर तपास सुरू केला आहे.