Image Source:(Internet)
नागपूर : नरेंद्रनगर पुलाजवळ गुरुवारी सायंकाळी जुन्या वादातून कुख्यात गुंडाची चाकूने वार करून हत्या (Murdered) करण्यात आल्याने खळबळ उडाली. गौरव पंकज रगडे (२५) असे मृताचे नाव असून, हत्येनंतर पसार होणाऱ्या गौरव रामभाऊ राऊत याला पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली. आरोपीकडून हत्येत वापरलेला चाकूही जप्त करण्यात आला आहे.
रगडे आणि राऊत यांच्यातील वादाला रगडेच्या प्रेयसीसोबत राऊतकडून सुरू असलेल्या हॉटेल व्यवसायाच्या तयारीची पार्श्वभूमी असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. छत्रपती चौक परिसरात ‘क्लाऊड किचन’ सुरू करण्यासाठी राऊतने खोली भाड्याने घेतली होती. राऊत आणि रगडेच्या प्रेयसीच्या भेटीगाठींची माहिती मिळाल्यानंतर रगडे संतप्त झाला होता.
गुरुवारी रगडे संबंधित खोलीत पोहोचला. त्यावेळी राऊत काही मित्रांसोबत मद्यपान करत होता. रगडेने मद्याच्या नशेत शिवीगाळ करत खोलीत तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली.
वाद वाढल्यानंतर रगडे तेथून पळून जाऊ लागला. राऊतने त्याचा पाठलाग केला. नरेंद्रनगर पुलाजवळ रगडे खाली पडताच राऊतने त्याच्यावर चाकूने सपासप वार केल्याचे पोलिसांनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या रगडेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेच्या वेळी अजनी पोलिस ठाण्याचे कर्मचारी मनीष भलमे आणि नरेश सावनकर परिसरात गस्तीवर होते. माहिती मिळताच दोघांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेश सावनकर घटनास्थळी थांबले, तर मनीष भलमे यांनी पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग सुरू केला. तब्बल दीड किलोमीटर पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी राऊतला ताब्यात घेतले.
मृत गौरव रगडे याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. नुकताच तो एका खून प्रकरणात जामिनावर कारागृहातून बाहेर आला होता. आरोपी राऊतचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर पोलिस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी पथकासह घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. हत्या बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने या प्रकरणी बेलतरोडी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हत्येत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.