
Image Source:(Internet)
नागपूर : डागा रुग्णालयातून अवघ्या काही तासांच्या नवजात मुलीला एका अनोळखी महिलेने घेऊन गेल्याची खळबळजनक घटना नागपुरात समोर आली आहे. बुरखा परिधान केलेल्या महिलेने शासकीय योजनेतून किट आणि आर्थिक मदत मिळणार असल्याचे सांगून बाळाच्या कुटुंबीयांशी जवळीक साधली. त्यानंतर फोटो काढण्याच्या बहाण्याने तिने बाळाला सोबत घेतले आणि रुग्णालयातून निघून गेली.
गुरुवारी रात्री डागा रुग्णालयात मुलीचा जन्म झाला होता. शुक्रवारी सकाळी बाळाला वॉर्डमध्ये हलविण्यात आले. दुपारी एकच्या सुमारास संशयित महिला वॉर्डमध्ये आली. तिने कुटुंबीयांना सरकारी योजनेअंतर्गत ५०० रुपयांचे किट आणि बाळाच्या आईला ५ हजार रुपयांची मदत मिळणार असल्याचे सांगितले.
महिलेने बाळाच्या आजीला वॉर्डबाहेर बोलावले. त्यानंतर बाळाचे फोटो काढण्याचे सांगून ती नवजात मुलीला घेऊन रुग्णालयातून बाहेर पडली. बराच वेळ उलटूनही महिला आणि बाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला. अखेर बाळ चोरीला गेल्याचे लक्षात येताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.
माहिती मिळताच तहसील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन संशयित महिलेचा माग काढण्याचे काम सुरू आहे. महिलेची ओळख पटवून नवजात मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.