Image Source:(Internet)
नागपूर : स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) आयोजित ‘अॅट होम’ कार्यक्रमात नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गोवा या चार राज्यांच्या समृद्ध लोकसंस्कृतीचे प्रभावी दर्शन घडविले. १५ ते १७ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यक्रमात लोकनृत्य, लोकवाद्ये आणि पारंपरिक कलाप्रकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका आस्था कार्लेकर यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हे सादरीकरण साकारण्यात आले. महाराष्ट्रातील लावणी, कोळी नृत्य, लेझिम, झांझ, धनगरी गजा, तुतारी, ढोल-ताशा, दशावतार आणि सोंगी मुखवटे यांचा समावेश होता. मध्यप्रदेशातील भगोरिया, गणगौर, बैगा कर्मा आणि बधाई, छत्तीसगडमधील मुरिया, गेड़ी, गौर मारिया आणि कक्सार, तर गोव्यातील समई, घुमट आणि घोडे मोडणी या लोककलांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली.
कार्यक्रमस्थळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची झलक दाखविणारी आकर्षक पारंपरिक सजावटही करण्यात आली होती. रांगोळी, आकाशकंदील, केळीच्या पानांपासून तयार केलेले प्रवेशद्वार तसेच खजूर आणि नारळाच्या पानांनी केलेली सजावट यामुळे परिसराला वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक रूप प्राप्त झाले.
या सांस्कृतिक महोत्सवात दक्षिण मध्य क्षेत्रातील १२० कलाकारांनी सहभाग घेतला. विविध लोकनृत्ये, लोकवाद्ये आणि पारंपरिक कलांच्या माध्यमातून चारही राज्यांच्या सांस्कृतिक वैविध्याचे सादरीकरण करण्यात आले.
संगीत संयोजन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूरचे संचालक अश्विन दळवी यांनी केले, तर नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी मैत्री बापट यांनी सांभाळली.
राष्ट्रपती भवनासारख्या प्रतिष्ठित राष्ट्रीय व्यासपीठावर नागपूरस्थित दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या माध्यमातून चार राज्यांच्या लोकपरंपरा आणि कलावैभवाचे सादरीकरण होणे, ही नागपूरसह विदर्भाच्या सांस्कृतिक क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.