हैदराबाद येथे दहावीच्या दोन विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापिकेची हत्या; चोरीच्या पैशांतून गोव्यात उधळपट्टी

    20-Aug-2026
Total Views |
 
Principal murdered
 Image Source:(Internet)
 
 
हैदराबाद : पैशांच्या लालसेने दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना (Students) इतके टोकाचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त केले की, त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिकेचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दहावीत शिकणाऱ्या या दोघांनी मुख्याध्यापिकेवर चाकूने तब्बल २७ वार केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर घरातून चोरलेल्या पैशांतून दोघांनी थेट गोव्याचा रस्ता धरला आणि तेथे मौजमजा केली.
 
मृत मुख्याध्यापिका कल्लू रुपा रेड्डी या कोडामलेपल्ली येथील नागार्जुन पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत होत्या. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

रोकड सापडल्यानंतर विद्यार्थ्यांना फटकारले-
काही दिवसांपूर्वी या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोकड सापडली होती. मुख्याध्यापिका रुपा रेड्डी यांनी याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी दोघांना चांगलेच फटकारले. यामुळे मुख्याध्यापिकेबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात राग निर्माण झाल्याचे तपासातून समोर आले आहे.
 
दीड लाखांची चोरी अन् रक्तरंजित हल्ला-
१२ ऑगस्टच्या रात्री रुपा रेड्डी यांचे पती घरी नसताना दोन्ही विद्यार्थी त्यांच्या घरी पोहोचले. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांनी सुमारे दीड लाख रुपये चोरले. याचवेळी रुपा रेड्डी यांनी त्यांना पाहिले. आपली ओळख उघड होऊ नये, या भीतीने एका विद्यार्थ्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. त्यानंतर दोघांनी मिळून मुख्याध्यापिकेची हत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
 
घटनेनंतर दोन्ही विद्यार्थी तेथून पसार झाले. चोरीच्या पैशांसह त्यांनी गोवा गाठला. तेथे काही दिवस फिरणे आणि पार्टी करण्यात त्यांनी पैसे खर्च केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
 
शेवटच्या संभाषणातील ‘बाबू’ ठरला महत्त्वाचा धागा-
रुपा रेड्डी यांच्या मोबाईलमधील शेवटच्या संभाषणाचा तपास करताना पोलिसांना ‘बाबू’ हा शब्द ऐकू आला. या एका शब्दावरून पोलिसांनी शाळेतील ‘बाबू’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली.
 
याच तपासादरम्यान एका विद्यार्थ्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. तो अचानक मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्याने आपल्या मित्रासोबत मिळून मुख्याध्यापिकेच्या घरात चोरी केल्याची आणि त्यांची हत्या केल्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
 
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रासह परिसरातही मोठी खळबळ उडाली आहे.