
Image Source:(Internet)
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी संख्येवरून आता नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. काग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ई-केवायसी आणि लाभार्थी पडताळणीच्या प्रक्रियेनंतर तब्बल ९२ लाख १० हजार महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आल्याचा दावा केला आहे.
वडेट्टीवार यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करत राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या मते, योजनेतील लाभार्थी संख्या २ कोटी ४८ लाखांवरून घटून आता सुमारे १ कोटी ६५ लाखांवर आली आहे. त्यामुळे लाखो महिलांना आर्थिक मदतीपासून दूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पात्र महिलांची संख्या कमी का?
योजना सुरू करण्यापूर्वी राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या माहितीनुसार सुमारे २ कोटी ४७ लाख महिला योजनेसाठी पात्र असल्याचे वडेट्टीवार यांनी नमूद केले. त्यानंतर लाभार्थी संख्येत एवढी मोठी घट कशामुळे झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारवर आरोपांचा भडिमार
ई-केवायसी आणि पडताळणीच्या प्रक्रियेच्या नावाखाली गरजू महिलांची नावे कमी केली जात असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. अपात्र लाभार्थ्यांना देण्यात आलेली रक्कम परत घेण्याऐवजी गरजू महिलांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याचेही त्यांनी म्हटले.
‘लाडकी बहीण’ योजना सरकारवर आर्थिकदृष्ट्या ओझे ठरत असल्याने लाभार्थी संख्या कमी केली जात आहे, असा आरोप करत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्यांच्या आरोपांवर सरकारकडून काय भूमिका मांडली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.