ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का; शिंदेंच्या शिवसेनेत विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांची मोठी एन्ट्री

    19-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतराचे सत्र पुन्हा वेगाने सुरू झाले आहे. उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष आणि बहुजन हक्क अभियानातील अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.

मुंबईतील नंदनवन निवासस्थानी झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात एकनाथ शिंदे यांनी नव्याने दाखल झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. या प्रवेशामुळे शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बार्शीत १३ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश-
माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पुढाकाराने वैराग नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सुजाता डोळसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १३ नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच सांगोला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील सुमारे २०० कार्यकर्तेही शिवसेनेत दाखल झाले.

धायटीचे सरपंच, तालुका अध्यक्ष रवीभाऊ मेटकरी, जिल्हा परिषद सभापती बंडू मोटे, मनोज ढोबळे यांच्यासह अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. उबाठा गटाचे माजी उपशहरप्रमुख दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन हक्क अभियानातील सचिन पालखे, श्रीकांत गायकवाड, दर्शन देशमुख आणि महिला अध्यक्ष बबिता मोकाशी यांच्यासह अनेकांनी शिवसेनेचा भगवा स्वीकारला.

चंद्रपुरातही शिवसेनेचे बळ वाढले-

चंद्रपूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पांडुरंग जाधव, जिवती नगर परिषदेचे नगरसेवक मारुती भुमरे यांच्यासह सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातही शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत वाढ झाल्याचे चित्र आहे.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांचाही शिवसेनेत प्रवेश-
आमदार नीलेश राणे यांच्या पुढाकाराने मुंबईतील मनसेचे माजी सरचिटणीस संतान फर्नांडिस, विभाग अध्यक्ष अमृत जावळे, फिटनेस ट्रेनर मनीष अडविलकर आणि महिला शरीरसौष्ठवपटू दीपा सप्रे यांच्यासह मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पनवेलमध्ये शेकापला धक्का-
पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस बाबा नाईक यांच्यासह अनेक कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले. शेकापचे जनरल सेक्रेटरी अशोक नाईक, प्रदीप पटेल, अनिल माने आणि विकास जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.

विविध जिल्ह्यांतील नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या या पक्षप्रवेशामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला संघटनात्मक बळ मिळाल्याचे मानले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.