दिल्लीतील सीएनजी पंपावर मोठा स्फोट; तिघांचा मृत्यू, तिघे जखमी

    19-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : दिल्लीतील टिकरी कलान परिसरात सीएनजी पंपावर गॅस भरण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक झालेल्या भीषण स्फोटात तिघांचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. बुधवारी घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

टिकरी कलान येथील सीएनजी पंपावर रिफिलिंग ट्रकमध्ये गॅस भरला जात होता. त्याचवेळी अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज परिसरात दूरपर्यंत ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही वेळातच घटनास्थळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरू करून जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून पंप परिसर सुरक्षित करण्यात आला.

स्फोट नेमका कशामुळे झाला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गॅस गळती, रिफिलिंग यंत्रणेतील तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे हा प्रकार घडला का, याचा तपास सुरू आहे. संबंधित यंत्रणांकडून पंपावरील उपकरणे आणि रिफिलिंग ट्रकची तपासणी केली जात आहे.

या दुर्घटनेनंतर सीएनजी पंपांवरील सुरक्षाव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सध्या पोलीस प्रत्यक्षदर्शींची माहिती घेत असून तपासातून स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. मृतांची ओळख आणि जखमींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.