नागपुरातील हॉटेलच्या रूम 302 मध्ये रक्तरंजित घटना; रेल्वेतील सहकाऱ्यांमध्ये वादानंतर तरुणीचा मृत्यू

    19-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये तरुणीवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत २८ वर्षीय शिवानी गजभिये हिचा मृत्यू झाला असून किरण आत्राम हा गंभीर जखमी झाला आहे. दोघेही रेल्वे विभागात कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेलच्या रूम क्रमांक ३०२ मधून किंकाळ्यांचा आवाज ऐकू आल्याने कर्मचाऱ्यांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली. त्यावेळी शिवानी आणि किरण दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. घटनास्थळी चाकूही सापडला.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, लग्नाच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला असावा. या वादातून किरणने शिवानीवर चाकूने हल्ला केल्याचा आणि त्यानंतर स्वतःलाही जखमी केल्याचा पोलिसांना संशय आहे.

घटनेची माहिती मिळताच बेलतरोडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच शिवानीचा मृत्यू झाला. किरणवर सध्या उपचार सुरू आहेत.

या घटनेमागील नेमके कारण काय होते, दोघांमध्ये वाद नेमका कशावरून झाला आणि हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा बेलतरोडी पोलीस तपास करत आहेत.