गोविंदा-सुनीता अहुजा यांच्यात पुन्हा सर्व काही सुरळीत? घटस्फोटाची याचिका घेतली मागे

    19-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता अहुजा यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना आता वेगळे वळण मिळाले आहे. सुनीता अहुजा यांनी गोविंदाविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडीमुळे गोविंदा आणि सुनीता यांच्यातील वैवाहिक नात्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, दोघांमध्ये नेमके काय घडले आणि याचिका मागे घेण्यामागील कारण काय, याबाबत अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

सकाळी फॅमिली कोर्टात पोहोचल्याने चर्चांना उधाण-
सुनीता अहुजा बुधवारी सकाळी मुलगा यशवर्धन याच्यासोबत मुंबईतील फॅमिली कोर्टात पोहोचल्या. त्यामुळे त्यांच्या आणि गोविंदाच्या नात्यात पुन्हा काही बिनसले आहे का, अशी चर्चा सुरू झाली. मात्र, त्याचदरम्यान त्यांनी घटस्फोटाची याचिका अधिकृतपणे मागे घेतल्याचे वृत्त समोर आले.

गेल्या काही महिन्यांपासून नात्यावर चर्चा

गोविंदा आणि सुनीता यांच्या नात्यात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चा काही काळापासून सुरू होत्या. दोघे लवकरच घटस्फोट घेणार असल्याचेही वृत्त समोर आले होते. त्यातच दोघांकडून एकमेकांबाबत वक्तव्ये आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली.

गोविंदाने सुनीता आपल्याला जबरदस्तीने अनेक रिअॅलिटी शोमध्ये घेऊन जात असल्याचा दावा केला होता. दुसरीकडे, सुनीता यांनी गोविंदाच्या कथित गर्लफ्रेंडच्या चर्चेवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे हे सेलिब्रिटी कपल सातत्याने चर्चेत राहिले.

मॅनेजर शशी सिन्हांनी काय सांगितले?

गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी सुनीता यांनी घटस्फोटाची याचिका कायदेशीररित्या मागे घेतल्याचे सांगितल्याचे वृत्त आहे.

त्यांच्या माहितीनुसार, यापूर्वी सुनीता यांनी याचिका दाखल केली होती; मात्र त्यावर पुढील कारवाई झाली नव्हती. आता त्यांनी अधिकृतपणे ही केस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

5 डिसेंबर 2024 रोजी दाखल केली होती याचिका?
रिपोर्ट्सनुसार, सुनीता अहुजा यांनी 5 डिसेंबर 2024 रोजी वांद्रे फॅमिली कोर्टात गोविंदाविरोधात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. या याचिकेत कथितरित्या विश्वासघात, क्रूरता आणि वेगळे राहणे यांसारख्या कारणांचा उल्लेख करण्यात आला होता.

मात्र आता ही याचिका मागे घेतल्याचे समोर आल्याने गोविंदा आणि सुनीता यांच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे. दोघांच्या वैवाहिक आयुष्यात पुन्हा शांतता आणि आनंदाचे दिवस येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.