
Image Source:(Internet)
नागपूर : वीज ग्राहकांच्या विविध अडचणी थेट ऐकून त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी महावितरणने आयोजित केलेल्या ग्राहक समाधान शिबिराला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर शहरातील पाच विभागांमधील १९ उपविभागीय कार्यालयांत एकाच दिवशी झालेल्या या शिबिरात ३३६ तक्रारी नोंदविण्यात आल्या. त्यापैकी ३०६ तक्रारी जागेवरच निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे एकूण ९१.०७ टक्के तक्रारींचे तत्काळ समाधान झाले.
उर्वरित ३० तक्रारीही पुढील सात दिवसांत प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन महावितरणने दिले आहे. मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अधीक्षक अभियंता प्रफुल लांडे यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसनगर, महाल, गांधीबाग, सिव्हील लाईन्स आणि बुटीबोरी विभागात हे शिबिर घेण्यात आले.
वाढीव वीजबिलांच्या तक्रारी सर्वाधिक-
शिबिरात वाढीव वीजबिले, स्मार्ट मीटर, नवीन वीज जोडणी, वीज बिलावरील नाव-पत्ता बदल आणि छतावरील सौर ऊर्जा योजनेसंदर्भातील तक्रारी मोठ्या प्रमाणावर आल्या. नाव व पत्ता बदलाच्या सर्व ३० तक्रारी, खंडित वीजपुरवठ्याच्या १८ तक्रारी तसेच नवीन जोडणीच्या दोन तक्रारी तातडीने निकाली काढण्यात आल्या.
वाढीव बिलांच्या १५८ तक्रारींपैकी १५२, स्मार्ट मीटरच्या ५३ पैकी ४७ आणि छतावरील सौर ऊर्जा योजनेच्या ४४ पैकी ३९ तक्रारींचेही जागेवरच निराकरण करण्यात आले.
स्मार्ट मीटरबाबत ग्राहकांच्या शंकांचे निरसन-
शिबिरात उपस्थित अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी थेट संवाद साधत स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. मीटरमधील अचूक नोंद, वीज वापराची तत्काळ माहिती, गळतीची माहिती तसेच मोबाईल अनुप्रयोगाच्या माध्यमातून वीज वापरावर देखरेख ठेवण्याच्या सुविधांबाबत ग्राहकांना मार्गदर्शन करण्यात आले.
महिन्यातून दोनदा शिबिर-
महावितरणकडून आता दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत सर्व उपविभागीय कार्यालयांमध्ये ग्राहक समाधान शिबिर घेण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी आपल्या समस्या थेट मांडून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.