
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेचा बंदोबस्त अधिक कडक करण्यात आला आहे. अशातच शहरातील विविध संवेदनशील ठिकाणांना बॉम्बस्फोटाच्या धमक्या मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे.
जामा नगर हाऊस, झंडेवालान इमारत, एमबी साकेत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल-३ तसेच दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाला धमकीचे दूरध्वनी आल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांसह बॉम्ब शोधक-नाशक पथके घटनास्थळी दाखल झाली.
सुरक्षा पथकांनी संबंधित परिसरांची कसून तपासणी केली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक पदार्थ आढळला नाही. त्यामुळे या धमक्या खोडसाळपणातून किंवा अफवा पसरवण्याच्या उद्देशाने दिल्या असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयालाही ईमेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याने सुरक्षा व्यवस्था आणखी वाढवण्यात आली. न्यायालय परिसरात बॉम्ब शोधक पथक तसेच प्रशिक्षित श्वानांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संवेदनशील ठिकाणी आधीपासूनच कडेकोट सुरक्षा तैनात आहे. धमकीच्या घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांनी अधिक सतर्कता बाळगली असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.