Image Source:(Internet)
मुंबई: आयुर्वेदिक (Ayurvedic) औषधांच्या निर्मितीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. राज्यातील ४३४ औषध उत्पादक संस्थांची अचानक तपासणी केल्यानंतर १० कंपन्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर नियमभंग आढळलेल्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानंतर ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. औषध उत्पादन केंद्रातील स्वच्छता, तांत्रिक कर्मचाऱ्यांची उपलब्धता, गुणवत्ता नियंत्रण, औषधांच्या चाचणीच्या नोंदी आणि उत्पादनाच्या लेबलची तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये काही ठिकाणी तांत्रिक कर्मचारी उपस्थित नसतानाही औषध उत्पादन सुरू असल्याचे आढळले. काही कंपन्यांकडे औषधांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी आवश्यक साधने आणि स्वतंत्र गुणवत्ता नियंत्रण व्यवस्था नव्हती. उत्पादन केंद्रातील अस्वच्छता, चुकीच्या उत्पादन तारखा, चाचणी अहवालांचा अभाव आणि आवश्यक नोंदी न ठेवल्याचेही निदर्शनास आले.
औषधांच्या घटकांचे परस्पर मिश्रण होऊ नये यासाठी आवश्यक खबरदारीची कार्यपद्धती नसल्याचेही काही ठिकाणी आढळले. या त्रुटींमुळे औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यात आली.
पुणे, गोंदिया, नाशिक आणि अमरावतीसह विविध जिल्ह्यांतील १० संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या औषध उत्पादकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.