नागपुरात भेष बदलत ज्येष्ठ महिलांना लुटणारा सराईत ठग अखेर पोलिसांच्या जाळ्यात

    12-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : वेगवेगळे भेष धारण करून ज्येष्ठ महिलांना हेरायचे, त्यांना बोलण्यात गुंतवायचे आणि संधी साधून अंगावरील सोन्याचे दागिने लंपास करायचे, अशा सराईत ठगाला नंदनवन पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या ५२ वर्षीय अफताब उर्फ फहीम अहमद शेख याला भांडे प्लॉट चौकातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीच्या चौकशीत नागपूरसह विविध ठिकाणी तब्बल १६ गुन्ह्यांची माहिती समोर आली आहे. नंदनवन, सक्करदरा, हुडकेश्वर आणि अजनी परिसरातील सुमारे सहा घटनांचा यात समावेश आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून इतर राज्यांतील गुन्ह्यांचीही माहिती तपासली जात आहे.

आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रफिती आणि तांत्रिक तपासाचा आधार घेतला. मात्र प्रत्येक गुन्ह्यानंतर तो पेहराव बदलून ठिकाण बदलत असल्याने त्याचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. अखेर तपासादरम्यान मिळालेल्या महत्त्वपूर्ण माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्यासाठी सापळा रचला.

यशोधरानगर परिसरातील डी-मार्टमधून खरेदी करून बाहेर पडत असताना आरोपी पोलिसांच्या हाती लागला. चौकशीत त्याची गुन्हा करण्याची पद्धतही समोर आली. चोरी केल्यानंतर तो दुचाकी एका ठिकाणी सोडून पायी पुढे जायचा. त्यानंतर रिक्षाने सोनाराकडे पोहोचून चोरीचे दागिने विकायचा आणि मिळालेले पैसे घेऊन शहराबाहेर निघून जायचा.

नांदेडला जाणाऱ्या वृत्तपत्र वितरणाच्या वाहनांमधून तो प्रवास करत असल्याचेही तपासात समोर आले आहे. नांदेडमध्ये जुगार खेळून पैसे खर्च केल्यानंतर पुन्हा नागपूर गाठून नव्या गुन्ह्याची तयारी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे, पोलिसांच्या नजरेत येऊ नये म्हणून तो रात्री हॉटेल किंवा लॉजमध्ये मुक्कामही करत नव्हता.

नागपूरव्यतिरिक्त छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि तेलंगणातही गुन्हे केल्याची माहिती आरोपीने दिली आहे. त्याने केलेल्या गुन्ह्यांची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून, त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीसह इतर साथीदारांचा शोधही घेतला जात आहे.