
Image Source:(Internet)
छत्रपती संभाजीनगर : देश स्वातंत्र्याची ८० वर्षे पूर्ण करत असताना ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था अद्याप कायम असल्याचा आरोप सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. मोठ्या इमारती आणि आधुनिक प्रकल्प उभे राहत असताना गावातील शाळांना मात्र मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
ग्रामीण शाळांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, वीज आणि विद्यार्थ्यांसाठी पुरेशी सुरक्षित व्यवस्था नसल्याचे दिपके यांनी सांगितले. दूरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना, विशेषतः मुलींना, या सुविधांच्या अभावामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
१५ ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर गावागावातील सरकारी शाळांच्या सुधारणेचा संकल्प करण्याचे आवाहन दिपके यांनी केले. प्रत्येक सरपंचाने आपल्या गावातील शाळेची पाहणी करून तिच्या सुधारणेसाठी पुढाकार घ्यावा, तसेच पालकांनीही शाळांना भेट देऊन मूलभूत सुविधांची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
शाळांमध्ये वीज, पाणी, स्वच्छतागृह आणि मध्यान्ह भोजनाची सुविधा व्यवस्थित उपलब्ध आहे की नाही, याचे पालकांनी सामाजिक लेखापरीक्षण करावे, असेही त्यांनी आवाहन केले. सुविधा उपलब्ध नसल्यास त्याची माहिती संबंधित माध्यमातून प्रशासनापर्यंत पोहोचवावी, असे त्यांनी सांगितले.
“मी स्वतः माझ्या हिंगोली जिल्ह्यातील गावी जाऊन सरपंचांना शाळा सुधारण्यासाठी विनंती करणार आहे. सर्व सरपंचांनी आपल्या गावातील शाळांची दुरवस्था दूर करण्यासाठी पुढाकार घ्यावा,” असे अभिजीत दिपके यांनी म्हटले.
गावकरी, पालक आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास सरकारी शाळांची स्थिती निश्चितपणे बदलू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.