
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला आता राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’प्रमाणेच कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा) विधेयक, २०२६’ला मंजुरी दिली असून, या निर्णयामुळे ‘वंदे मातरम्’च्या अवमानाविरोधात कठोर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.
संसदेने गेल्या महिन्यात ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण कायदा, १९७१’मध्ये सुधारणा करणारे हे विधेयक मंजूर केले होते. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर या सुधारणेचे कायद्यात रूपांतर झाले आहे.
अवमान केल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षा-
नव्या तरतुदीनुसार ‘वंदे मातरम्’चे गायन रोखणे किंवा गायन सुरू असताना त्यात जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करणे हा गंभीर गुन्हा मानला जाणार आहे. दोषी व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा याच प्रकारचा गुन्हा केल्यास किमान एक वर्षाच्या कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.
यापूर्वी १९७१च्या कायद्यात राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’च्या अवमानासंदर्भातच शिक्षेची तरतूद होती. ‘वंदे मातरम्’ला राष्ट्रीय गीताचा दर्जा असूनही त्याच्या अवमानासाठी स्वतंत्र कायदेशीर संरक्षण नव्हते. नव्या सुधारणेत ही त्रुटी दूर करण्यात आली आहे.
‘वंदे मातरम्’ला कार्यक्रमांमध्ये प्रथम स्थान-
केंद्र सरकारने ‘वंदे मातरम्’च्या गायनासाठी नवीन नियमावलीही जारी केली आहे. त्यानुसार एखाद्या शासकीय कार्यक्रमात ‘जन-गण-मन’ आणि ‘वंदे मातरम्’ दोन्ही गायले जाणार असल्यास ‘वंदे मातरम्’चे गायन प्रथम केले जाणार आहे.
यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रथमच ‘वंदे मातरम्’चे गायन केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये गीताची सर्व सहा कडवी गायली जाणार असून, त्यासाठी सुमारे तीन मिनिटे दहा सेकंदांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
शाळांमध्येही ‘वंदे मातरम्’ने दिवसाची सुरुवात-
देशातील शाळांमध्ये दैनंदिन कामकाजाची सुरुवात ‘वंदे मातरम्’च्या समूहगायनाने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. राष्ट्रीय गीत सुरू असताना उपस्थितांनी सावधान स्थितीत उभे राहून आदर व्यक्त करणे अपेक्षित आहे.
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या ‘वंदे मातरम्’ गीताचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. २४ जानेवारी १९५० रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही ‘वंदे मातरम्’ला विशेष सन्मान देण्याची भूमिका मांडली होती. नव्या कायदेशीर सुधारणेमुळे या ऐतिहासिक भूमिकेला अधिक बळ मिळाले आहे.