Image Source:(Internet)
नागपूर : तेलंगणा पोलिसांनी अमली पदार्थांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत कोट्यवधी रुपयांच्या एमडीचा (MD) साठा जप्त केला आहे. यदाद्री-भुवनगिरी जिल्ह्यातील कोंडामडुगु भागात छापा टाकून पोलिसांनी २७ किलो मेफेड्रोन (एमडी) हस्तगत केली. या अमली पदार्थाची अंदाजे किंमत ५४ कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे.
एमडी तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गुप्त ठिकाणाचा पोलिसांनी शोध घेतला. तेथे मोठ्या प्रमाणावर ४० किलो अॅसिटोन तसेच एमडी निर्मितीसाठी लागणारी विविध उपकरणे मिळून आली. या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या निर्मितीचे मोठे जाळे उघडकीस आले आहे.
तपासाची दिशा नागपूरकडे वळली असून, चेतन मधुकर मेश्राम (४९) याला या रॅकेटचा कथित मुख्य सूत्रधार आणि आर्थिक पाठबळ देणारा आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह आकाश अशोक गावंडे आणि अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, नागपूरमधील गोपाल सिरपत पटले आणि चंदा प्रदीप ठाकूर हे संशयित पोलिसांच्या हाती लागलेले नसून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हैदराबादमध्ये तयार होणारी एमडीची ही खेप नागपूरसह संपूर्ण विदर्भात पोहोचविण्याचे नियोजन असल्याचा संशय आहे. त्यामुळे या कारवाईमुळे नागपूरमधील अमली पदार्थांच्या व्यवहाराशी संबंधित आणखी काही चेहरे समोर येण्याची शक्यता आहे.
सध्या पोलिसांकडून आरोपींची चौकशी करून एमडी तयार करण्यापासून ते तिच्या नागपूरपर्यंतच्या पुरवठ्यापर्यंतची संपूर्ण साखळी शोधण्याचे काम सुरू आहे.