Image Source:(Internet)
नागपूर : मोक्षधाम (Mokshadham) परिसरातील झुडपांमध्ये एका युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. मृतदेह दिसताच परिसरातील नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे इमामवाडा परिसरात एकच खळबळ उडाली.
माहिती मिळताच इमामवाडा पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून, प्राथमिक तपासात मृतकाची ओळख कमलेश अशी समोर आली आहे. मात्र, त्याचे संपूर्ण नाव तसेच इतर माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.
युवकाचा मृतदेह झुडपांमध्ये आढळल्याने त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. परिस्थिती संशयास्पद असल्याने पोलिसांकडून घातपाताची शक्यता तपासली जात आहे.
घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून पोलिसांनी आवश्यक पुरावे जमा करण्यास सुरुवात केली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच युवकाच्या मृत्यूमागे कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असून इमामवाडा पोलीस संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत आहेत.