तुकाराम मुंढेंना हटवू नका; परेश रावलांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे खास विनंती

    10-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेचे कौतुक होत असतानाच आता बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनीही त्यांच्या कामाला पाठिंबा दिला आहे.

परेश रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत तुकाराम मुंढे यांची सध्याच्या विभागातून बदली करू नये, अशी विनंती केली आहे. मुंढे यांना त्यांच्या पदावर काम करण्यासाठी संरक्षण मिळावे आणि त्यांना हटवले जाऊ नये, अशी भूमिका रावल यांनी मांडली.

खाद्यपदार्थांच्या भेसळीवर कडक कारवाई-
मे २०२६ मध्ये FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यातील अन्न सुरक्षेच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले. हॉटेल्समधील स्वच्छता, भेसळयुक्त पनीर आणि दूध तसेच निकृष्ट खाद्यपदार्थांच्या विरोधात तपासणी आणि कारवायांना वेग आला.

नियमांचे पालन न करणाऱ्या हॉटेल्स, कॅन्टीन आणि औषध दुकानांवरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे अन्न व्यवसायातील नियमभंग करणाऱ्यांमध्ये धाक निर्माण झाल्याचे चित्र आहे.

जंक फूडवरही प्रशासनाची नजर-

विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा लक्षात घेऊन शाळांच्या परिसरात जंक फूडच्या विक्रीवर निर्बंध आणण्याच्या निर्णयामुळेही मुंढे चर्चेत आले आहेत. अन्नाची गुणवत्ता आणि नागरिकांचे आरोग्य याबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असा संदेश त्यांच्या कारवायांमधून दिला जात आहे.

परेश रावलांकडून कौतुक-
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे त्यांची बदली टाळण्याची मागणी केली आहे. त्यामुळे मुंढे यांच्या कारवाईला आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, मुंढे यांच्याबाबत सरकार पुढे कोणता निर्णय घेणार आणि त्यांच्या सध्याच्या पदाबाबत काय भूमिका घेतली जाणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.