
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : देशातील अनेक भागांत पावसाने पुन्हा जोर धरला असून, भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी तब्बल १७ राज्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून देशातील काही राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असला, तरी आता पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.
या १७ राज्यांना पावसाचा इशारा-
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, गुजरात, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या १७ राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी-
दुसरीकडे, महाराष्ट्रात सध्या पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात बहुतांश भागात मोठ्या पावसाची शक्यता कमी असून, तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
राज्यात यंदा पावसाचे वितरण असमान राहिले आहे. कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर सोलापूरसह मराठवाड्यातील काही भागांमध्ये अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. सोलापूर जिल्ह्यात सुमारे ३३ टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे.
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही पावसाची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे एका बाजूला अतिवृष्टीमुळे काही भागांना पुराचा फटका बसत असताना, दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
हवामान तज्ज्ञ एस. डी. सानप यांच्या अंदाजानुसार, पुढील दोन महिन्यांत महाराष्ट्रात सरासरी पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र, यंदा राज्यात पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता कायम असून, काही भागांत अतिवृष्टी तर काही ठिकाणी पावसाची कमतरता असे चित्र पाहायला मिळू शकते.