Image Source:(Internet)
कोल्हापूर : राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला (Farmers) दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. यावर्षीच्या अखेरपर्यंत ९० टक्के, तर पुढील वर्षी १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शेतकऱ्यांना थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्याची योजनाही सरकार राबवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सध्या सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आल्याने राज्यातील ७४ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी सरकार दरवर्षी २५ हजार कोटी रुपये खर्च करत असून, ५८ हजार कोटी रुपयांची थकबाकीही सरकारने भरली आहे. तसेच कर्जमाफीचा लाभ ५६ हजार शेतकऱ्यांना मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
साखर उद्योगाच्या स्थैर्यासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असल्याचे सांगत फडणवीस यांनी ऊस उत्पादकांना एफआरपी देणे यामुळे शक्य होत असल्याचे स्पष्ट केले. साखर कारखानदारीत ‘शून्य कचरा’ संकल्पनेतून संपीडित जैववायू आणि सीएनजी निर्मिती करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कोल्हापूर जिल्ह्यात देशातील पहिला एकत्रित संपीडित जैववायू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करताना फडणवीस यांनी त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक योगदानातून बहुजन समाजासाठी शिक्षण व रोजगाराची दारे खुली झाल्याचे सांगितले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही शाहू महाराजांचे शेतकरी हिताचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे म्हटले. कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
फडणवीस-जयंत पाटील यांच्या विमानप्रवासाने राजकीय चर्चेला उधाण
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार जयंत पाटील यांनी मुंबई ते कोल्हापूर असा एकत्र विमानप्रवास केला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरही त्यांच्यासोबत होते. सुमारे तासभराच्या प्रवासादरम्यान फडणवीस आणि जयंत पाटील यांच्यात राजकीय चर्चा झाल्याची माहिती आहे.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झालेली भेट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची पंतप्रधानांसोबत होणारी नियोजित भेट, या पार्श्वभूमीवर फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या एकत्र प्रवासामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद आणि जयंत पाटील यांना राज्यात अर्थमंत्रिपद मिळण्याच्या चर्चांनाही यामुळे पुन्हा जोर आला आहे.