
Image Source:(Internet)
नागपूर : भूखंड विकासाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. विशेषतः परदेशात किंवा परगावी नोकरी करणाऱ्या मुलांच्या ज्येष्ठ पालकांची दिशाभूल करून त्यांच्या मालमत्तेवर बळजबरी करण्याचे प्रकार घडत असतील, तर संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, असे निर्देश महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पोलिसांना दिले.
नागपूर पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित कायदा व सुरक्षा व्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मालमत्तेबाबत दबाव किंवा फसवणूक होत असल्यास ज्येष्ठ नागरिकांनी तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही बावनकुळे यांनी केले. अशा प्रकरणांची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून दखल घेत कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहर-ग्रामीण भागातील सीसीटीव्ही यंत्रणा एकत्रित होणार-
नागपूरच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही कमतरता राहू नये यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून पोलिसांना अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील सीसीटीव्ही यंत्रणेसाठी एकत्रित नियंत्रण केंद्र उभारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या कॅमेऱ्यांचे अद्ययावतीकरण करून ज्या ठिकाणी तांत्रिक अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करण्याचे निर्देशही देण्यात आले.
ग्रामीण भागातील सीसीटीव्ही प्रकल्प अधिवेशनापूर्वी पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. शहरातील सीसीटीव्ही प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या सक्षम पद्धतीने एका संस्थेमार्फत राबविण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
वाहतूक कोंडीवरही पोलिसांनी लक्ष द्यावे-
शहरातील वाहतूक व्यवस्थेबाबत सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असल्याचे बावनकुळे यांनी नमूद केले. विविध ठिकाणी बांधकामे सुरू असली तरी नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, यासाठी पोलिसांनी योग्य नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले.
गुन्हेगारांवर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नजर-
दरम्यान, नागपूर पोलीस विभागाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नवीन कार्यपद्धती विकसित करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘सिम्बा’ प्रणालीच्या माध्यमातून गुन्ह्यांशी संबंधित माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. सीसीटीव्ही चित्रफिती, छायाचित्रे, ध्वनिमुद्रण आणि इतर उपलब्ध माहितीच्या आधारे गुन्हेगारांचा तपशील संकलित केला जात आहे.
तसेच सामाजिक माध्यमांवर लक्ष ठेवण्यासाठी ‘गरुड दृष्टी’ प्रणालीचा वापर करण्यात येत असून, पोलिसांची स्वतंत्र पथके चोवीस तास त्यावर देखरेख ठेवत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.
बैठकीला आमदार डॉ. राजीव पोतदार यांच्यासह पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.