तुकाराम मुंढे व्यासपीठावर येताच टाळ्यांचा कडकडाट; प्रेक्षकांनी उभे राहून दिली दाद

    10-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे : आपल्या धडक कारवाईच्या शैलीमुळे नेहमीच चर्चेत असलेले महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तथा वरिष्ठ आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या कार्यक्रमात त्यांच्या आगमनावेळी प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

शनिवारी आयोजित या जाहीर मुलाखतीच्या कार्यक्रमासाठी तुकाराम मुंढे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंढे व्यासपीठाकडे येताच सभागृहातील अनेक प्रेक्षकांनी आपल्या जागेवरून उभे राहत त्यांना उत्स्फूर्त दाद दिली. त्यांच्या आगमनाचा क्षण अनेकांनी मोबाइल कॅमेऱ्यात कैद केला. या स्वागताचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

धडक कारवायांमुळे वाढली लोकप्रियता
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये हॉटेल्स, उपाहारगृहे आणि खाद्यपदार्थ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली.

या कारवाईदरम्यान अस्वच्छ परिस्थितीत अन्नपदार्थ तयार करणे, उघड्यावर अन्न ठेवणे, बुरशी आलेले मांस तसेच वारंवार वापरलेले खाद्यतेल यांसारख्या गंभीर बाबी आढळून आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सुमारे १०० आस्थापनांवर परवाने निलंबित करण्याची कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मुंढे यांच्या या धडक कारवाईमुळे अन्न सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये धास्ती निर्माण झाली असताना, सर्वसामान्य नागरिकांकडून मात्र त्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कार्यक्रमात त्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची जोरदार चर्चा सुरू आहे.