सर्पदंशानंतर गंभीर झालेल्या ११ वर्षीय दीपिकाची नागपूरला हलविले; हेलिकॉप्टरने केले एअरलिफ्ट

    10-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत सर्पदंशाची गंभीर घटना घडली. या घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून, गंभीर अवस्थेतील ११ वर्षीय दीपिका बिलकुरासाय मडावी हिला तातडीने उपचारासाठी नागपुरात आणण्यात आले आहे.

जपतलाई येथील निवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात मध्यरात्री काही विद्यार्थिनींना विषारी सापाने दंश केला. घटनेनंतर विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तीन विद्यार्थिनींचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी काही विद्यार्थिनींवर उपचार सुरू आहेत.

दीपिकाची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारांसाठी नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागाने तातडीने हालचाली करत हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. त्यानंतर दीपिकाला एअरलिफ्ट करून नागपुरात आणण्यात आले.

दीपिकाला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून तिच्यावर उपचार सुरू असून, तिच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.

दरम्यान, एकाच घटनेत तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा गंभीर झाला आहे. वसतिगृहात साप शिरण्यामागील कारण आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.