विद्यार्थ्यांना माफी नव्हे, न्याय द्या; उद्धव ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर घणाघात

    01-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यानंतर उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. आंदोलक विद्यार्थ्यांना माफ करण्याची भाषा करण्याऐवजी, या प्रकरणामुळे जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले.

माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना "भरकटलेले" म्हणणे योग्य नाही. रोजगार, शिक्षण आणि भविष्यासाठी लढणाऱ्या तरुणांच्या भावना समजून घेण्याऐवजी त्यांच्यावर टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस कारवाईवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलकांवर लाठीमार, पॅलेट गनचा वापर तसेच काही महिला आंदोलकांशी गैरवर्तन झाल्याचे आरोप अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी या घटनांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.

सोशल मीडियावरील ट्रोलिंगचाही उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले जात आहे. सरकारने अशा प्रकारांना आळा घालण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य होत्या. सरकारने वेळेवर संवाद साधला असता, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती. देशाच्या भवितव्याचा पाया असलेल्या तरुणांना दोष देण्यापेक्षा त्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

नीट पेपरफुटी प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, विरोधकांकडून केंद्र सरकारवर सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे.