धनुष्यबाण आमचाच राहील; सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी उद्धव ठाकरेंचा मोठा विश्वास

    01-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख आणि विधानसभा प्रमुखांची ऑनलाइन बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पक्ष संघटना, आगामी राजकीय रणनीती आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या पक्ष व निवडणूक चिन्हाच्या वादावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत आत्मविश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयाकडून न्याय मिळेल आणि शिवसेनेचे पारंपरिक 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह आपल्या पक्षालाच मिळेल, असा विश्वास त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांनी असेही सांगितल्याची माहिती आहे की, कोणत्याही परिस्थितीत हे निवडणूक चिन्ह दुसऱ्या गटाकडे जाणार नाही. जर आवश्यक झाले, तर न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडून ते चिन्ह गोठवण्याचाही निर्णय होऊ शकतो, असा दावाही त्यांनी केला.

शिवसेना आणि पक्षाच्या निवडणूक चिन्हासंदर्भातील वादावर 2022 पासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, नुकतीच या प्रकरणाची महत्त्वाची सुनावणी पार पडली आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णयाकडे राज्यातील राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना संघटन अधिक मजबूत करण्याच्या सूचना दिल्या. न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी पक्षाची तयारी कायम ठेवावी आणि तळागाळात संघटनात्मक कामाला गती द्यावी, असे आवाहन त्यांनी केल्याची माहिती बैठकीनंतर समोर आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, शिवसेनेच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाच्या वादाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.