'जय श्रीराम' म्हणून होणार नाही, तरुणांना शिक्षण आणि रोजगार द्य; राज ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

    01-Aug-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पेपरफुटी, बेरोजगारी आणि तरुणांच्या प्रश्नांवरून केंद्र सरकार व भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही वक्तव्यांवरही निशाणा साधत तरुणांच्या अपेक्षा आणि समस्यांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगितले.

पेपरफुटीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "तरुण चुकीच्या मार्गावर गेलेले नाहीत, तर त्यांच्या आशा-आकांक्षाच संपवल्या जात आहेत." त्यांनी ओशो यांच्या एका विचाराचा उल्लेख करत, "रस्ता बनवणाऱ्यांनीच चुकीचा रस्ता तयार केला असेल, तर तरुणांना दोष का द्यायचा?" असा सवाल उपस्थित केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रोल करणाऱ्यांना माफ केल्याच्या वक्तव्याचा संदर्भ देत राज ठाकरे म्हणाले, "आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांची माफी कोण मागणार?" विद्यार्थ्यांच्या वेदना आणि रोजगाराच्या अपेक्षा समजून घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

धार्मिक मुद्द्यांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले, "आजचा हवालदिल झालेला तरुण मंदिराचा रस्ता पकडतोय. त्याला धर्मांध करू नका, शिक्षणाच्या वाटेवर लावा. नुसतं 'जय श्रीराम' म्हणून काही होणार नाही." तरुणांना शिक्षण, रोजगार आणि संधी मिळणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गोरक्षकांच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारवर टीका करत, "एकीकडे गोरक्षक गाड्या अडवतात, तर दुसरीकडे पंतप्रधान परदेशात जाऊन भारत बीफ निर्यातीत अव्वल असल्याचे सांगतात. मग या विरोधाभासाचे काय?" असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच उद्योगपतींना जमीन आणि जंगले दिली जात असल्याचा आरोप करत, "दिसली जमीन की दे अदानीला, दिसलं जंगल की दे अदानीला," अशी टीकाही त्यांनी केली. ही टीका परिस्थिती समजून घेण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राम मंदिरातील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांचाही उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, "राम मंदिराच्या नावावर मते मागितली जातात, पण कथित आर्थिक घोटाळ्यांवर कोणी बोलत नाही." या मुद्द्यावरही त्यांनी सरकारकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा व्यक्त केली.