विविध स्पर्धांतील विजेत्यांचा गौरव

Image Source:(Internet)
नागपूर : सोनेरी पहाटच्या संयोजिका रेखा भोंगाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या 'सुपर मॉम क्राऊन 2026 – सीझन 6', 'मिस फॅशन आयकॉन', 'किड्स फॅशन आयकॉन', 'सुपर मॉम अवॉर्ड' तसेच 'महाराष्ट्र आयकॉन अवॉर्ड' या भव्य कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लावा येथील ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडलेल्या या सोहळ्यात सौंदर्य, आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि कौशल्यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी सेलिब्रिटी गेस्ट म्हणून डॉ. सृष्टी बाहेकर, प्रमुख अतिथी म्हणून वृंदाताई ठाकरे, तसेच आर्किटेक्ट रीतुजा जयस्वाल, आशीर खान, वर्षा चौधरी, ज्योती पाटील, प्रतिभा पाटील, रीना जयस्वाल, शालू व्यास, संजय वानखेडे, तृप्ती बहिरे, प्रणिता शाहू, रोहित रामटेके, दिपावली चौधरी, अल्पना राय, नगरसेविका निधी तेलगोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगानाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. आरोही डुकरे हिने सादर केलेल्या आकर्षक गणेश वंदनेने उपस्थितांची मने जिंकली आणि कार्यक्रमाला मंगलमय वातावरण लाभले.
या स्पर्धेत 50 हून अधिक स्पर्धकांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला. लहान मुलांपासून ते महिलांपर्यंत सर्वच स्पर्धकांनी रॅम्पवर आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण करत प्रेक्षकांची दाद मिळवली.
सोनेरी पहाटच्या विविध मानकरी म्हणून जयश्री पजई यांची फेस ऑफ सोनेरी पहाट, आरती डुकरे यांची ब्रँड ॲम्बेसेडर तर सोनम गेडाम यांची विनर ऑफ सोनेरी पहाट म्हणून निवड करण्यात आली. युक्ती असाटी हिने शो स्टॉपर म्हणून विशेष आकर्षण ठरली.
किड्स फॅशन आयकॉन स्पर्धेत देवांशी पचार हिने विजेतेपद पटकावले. आयशा ढोणे प्रथम उपविजेती तर आर्या वासनिक द्वितीय उपविजेती ठरली. गौरी चौधरी हिची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली. स्मिरल गायकवाड आणि आहाना गेडाम यांनी शो ओपनर म्हणून कार्यक्रमाची रंगत वाढवली.
मिस फॅशन आयकॉन स्पर्धेत कोमल जावळेकर आणि विधी जावळे यांनी विजेतेपद मिळविले. टीन फॅशन आयकॉनमध्ये अन्वेषा शिंगणे आणि अवनी अनमलवार यांनी विजेतेपद पटकावले. जानवी मेश्राम हिने शो ओपनर तर गौरी बहिरे हिने शो स्टॉपर म्हणून विशेष छाप पाडली.
सुपर मॉम क्राऊन – सीझन 6 मध्ये किरण गवई आणि संगीता पवार या विजेत्या ठरल्या. नयना येरावार यांनी प्रथम उपविजेतेपद, तर सारिका जावळेकर यांनी द्वितीय उपविजेतेपद पटकावले.
स्पर्धेचे परीक्षण प्रार्थना मेश्राम, दीपाली राऊत, नीलम शिव, सुनीता बनसोडे आणि रश्मी तिरपुडे यांनी परीक्षक म्हणून केले. कार्यक्रमाचे फॅशन कोरिओग्राफीचे उत्कृष्ट नियोजन डॉ. रितू चौधरी, शिल्पा मेश्राम आणि रिमा उईके यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंकिता भोंगाडे-सुरकर ,मोनालिसा, कोमल, अपूर्वा, शुभांगी, स्मिता, सपना, रेणू, युक्ती, स्नेहा, आशिष, प्रगती आणि ऋण यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या शेवटी संयोजिका रेखा भोंगाडे यांनी उपस्थित मान्यवर, परीक्षक, स्पर्धक, पालक आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. महिला आणि बालकांमधील आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि कला-सौंदर्याला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.