
Image Source:(Internet)
श्रीनगर : दक्षिण काश्मीरातील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा मानवतेला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. शुक्रवारी (३१ जुलै) रात्री वीटभट्टीवर काम करणाऱ्या छत्तीसगडमधील दोन स्थलांतरित हिंदू मजुरांची नाव आणि धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यामुळे २०२५ मधील पहलगाम हल्ल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुलगामच्या केल्लम परिसरातील एका वीटभट्टीवर महेंद्र कुमार आणि दीपक रात्रे हे दोघे मजूर काम करत होते. रात्री काही सशस्त्र दहशतवादी तेथे पोहोचले. त्यांनी प्रथम दोघांची ओळख, नाव आणि धर्म विचारला आणि त्यानंतर त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
प्राथमिक माहितीनुसार, काश्मीरबाहेरील स्थलांतरित मजुरांना लक्ष्य करून हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेने स्वीकारल्याचे वृत्त आहे.
घटनेनंतर जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. "कुलगाममधील अमानुष दहशतवादी हल्ल्यात दोन निष्पाप मजुरांचा मृत्यू झाला आहे. या भ्याड कृत्याचा मी तीव्र निषेध करतो. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई अधिक तीव्र करून त्यांचा खातमा करावा," असे निर्देश त्यांनी दिले.
हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर पोलिस आणि सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी करून मोठी शोधमोहीम सुरू केली आहे. या घटनेमुळे काश्मीरमध्ये काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे.