
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात साखळीचोरांनी पुन्हा डोके वर काढले असून, एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या भागांत महिलांना लक्ष्य करत मंगळसूत्र आणि सोन्याच्या साखळ्या हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. सक्करदरा, हुडकेश्वर आणि बेलतरोडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी या वारदाती केल्या. तिन्ही घटनांतील पद्धत एकसारखी असल्याने शहरात सक्रिय असलेल्या एकाच साखळीचोर टोळीचा हा कारनामा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पहिली घटना दुपारी सुमारे ३.४० वाजता सक्करदरा परिसरात घडली. बसची वाट पाहत उभ्या असलेल्या सुनीता जाधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी क्षणात हिसकावून नेले.
या घटनेनंतर अवघ्या पाच मिनिटांत हुडकेश्वर परिसरातील सुभेदार ले-आऊट येथे दुसरी वारदात घडली. पायी घरी निघालेल्या शीला पौणीकर यांच्या गळ्यातील सुमारे तीन तोळे वजनाची सोन्याची साखळी चोरट्यांनी पळवून नेली.
तिसरी घटना रात्री साडेदहाच्या सुमारास बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसा चौकाजवळ घडली. गौरी मिडास अपार्टमेंटजवळ शालू ढवस या मुलगी व शेजारीणीसोबत फिरून परतत असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केले.
तीन्ही प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांत अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घटनास्थळांवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा माग काढण्याचे काम सुरू आहे. तिन्ही घटनांमध्ये एकाच प्रकारची कार्यपद्धती आणि काळ्या रंगाच्या दुचाकीचा वापर झाल्यामुळे एकाच टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे.