
Image Source:(Internet)
मुंबई : राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडींमध्ये गुरुवारी आणखी एका महत्त्वाच्या भेटीची भर पडली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन आमदार आणि मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असले, तरी बैठकीचा केंद्रबिंदू मुंबईतील विकासकामे असल्याचे समोर आले आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळात अनिल परब, सुनील प्रभू आणि अजय चौधरी या आमदारांचा समावेश होता. या बैठकीत मुंबईतील विविध प्रलंबित विकासकामे, पायाभूत सुविधा, नागरिकांच्या समस्या आणि आगामी प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचा आढावा सभागृहात मांडला होता. त्यानंतर त्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ठाकरे गटाच्या आमदारांनी ही भेट घेतल्याची माहिती आहे.
बैठकीदरम्यान शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांकडे एक निवेदनही सुपूर्द केले. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचणे, वाहतूक विस्कळीत होणे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली.
अलीकडील राजकीय पक्षांतरांच्या पार्श्वभूमीवर या भेटीची चर्चा रंगली असली, तरी संबंधित नेत्यांनी ही भेट केवळ मुंबईतील जनहिताच्या प्रश्नांसाठी आणि विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी झाल्याचे स्पष्ट केले आहे.