शरद पवार NDAत जाणार नाहीत;शिंदेंच्या भेटीवरून संजय राऊतांची नाराजी

    09-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विधिमंडळ परिसरात झालेल्या भेटीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीवर प्रतिक्रिया देताना शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी शरद पवार हे भाजपप्रणीत एनडीएमध्ये जाणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला. मात्र, शिंदे यांच्या दालनात जाऊन भेट घेणे योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले.

राऊत म्हणाले की, शरद पवार हे राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पाडून सत्तेत सहभागी झालेल्या नेत्यांच्या कार्यालयात जाऊन बैठक घेणे आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणारे आहे. अशा भेटींमुळे चुकीचा संदेश जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सीमावादाच्या बैठकीवरही सवाल-
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादासंदर्भात आयोजित उच्चस्तरीय बैठकीसाठी शरद पवार विधिमंडळात आले होते. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात भेट घेतली आणि तेथेच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठकही पार पडली.

यावर आक्षेप घेत राऊत म्हणाले की, इतक्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी इतर पर्यायी ठिकाणे उपलब्ध होती. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान किंवा राष्ट्रवादी भवनमध्येही बैठक होऊ शकली असती. शिवसेना अशा परिस्थितीत असती, तर अशा ठिकाणी बैठक घेतली नसती, असेही त्यांनी सांगितले.

सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह-

राऊत यांनी सीमावादाच्या बैठकीतील निर्णय आणि सरकारची भूमिका सार्वजनिक न केल्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले. महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंधित या विषयावर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना विश्वासात घेतले गेले नाही, असा आरोप त्यांनी केला.

'गद्दारीविरोधात लढा आणि त्यांनाच सन्मान?

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेवर टीका करताना राऊत म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात ज्या नेत्यांविरोधात कायदेशीर लढा सुरू आहे, त्याच नेत्यांना सार्वजनिकरीत्या सन्मान देणे योग्य नाही.

तथापि, शरद पवार यांच्या धर्मनिरपेक्ष भूमिकेबाबत कोणतीही शंका नसल्याचे स्पष्ट करत, "शरद पवार कधीही एनडीएमध्ये सामील होणार नाहीत," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र, या भेटीबाबत त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करून आपली भूमिका मांडणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले.