'शरद पवार गटाचे ५ ते ६ खासदार अस्वस्थ'; पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण

    09-Jul-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पक्षांतराच्या चर्चांना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे नवी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार गटातील पाच ते सहा खासदार अस्वस्थ असून, पक्षात मोठी घडामोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) मधील सहा खासदारांनी बंड करत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केल्यानंतर आता राज्यात 'ऑपरेशन तुतारी' सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने अशा सर्व चर्चांचे खंडन करत, पक्षातील कोणताही आमदार किंवा खासदार पक्ष सोडणार नसल्याचा दावा केला आहे.

दरम्यान, बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ परिसरात भेट घेतली. या भेटीनंतर महाविकास आघाडीत विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, ठाकरे गटातही अस्वस्थतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

याच पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना, "शरद पवार गटातील पाच ते सहा खासदार अस्वस्थ आहेत. ठाकरे गटासारखी परिस्थिती या पक्षातही निर्माण होऊ शकते. मात्र, ते प्रत्यक्षात पक्ष सोडतील की नाही, हे सध्या सांगता येणार नाही," असे वक्तव्य केले.

दरम्यान, शरद पवार-एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी एकाच वाहनातून प्रवास करत सुमारे ३० मिनिटे चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या सलग राजकीय भेटींमुळे राज्यातील आगामी राजकीय घडामोडींविषयी विविध तर्कवितर्कांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

मात्र, शरद पवार गटाकडून पक्षात कोणतीही फूट पडणार नसल्याचा पुनरुच्चार करण्यात आला असून, पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.