
Image Source:(Internet)
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवरंग भोजनालयात सुरू असलेल्या कथित दारू पार्टीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या गुन्हे शाखेच्या युनिट-३च्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. कारवाईदरम्यान एका आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याला चापट मारून धक्काबुक्की केली, सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून आणखी एका व्यक्तीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ जुलै रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजता नवरंग भोजनालयात काही जण मद्यपान करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट-३ला मिळाली होती. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन हॉटेल चालक व कर्मचाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. यावेळी अंबाझरी येथील मरारटोली परिसरातील मनोज राजेश उईके (वय ३२) याने पोलिसांच्या कारवाईला विरोध करत शिवीगाळ केली. त्यानंतर त्याने एका पोलिस कर्मचाऱ्याची कॉलर पकडून धक्काबुक्की केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. त्याला आवरण्यासाठी पुढे आलेल्या इतर पोलिसांशीही त्याने झटापट केल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांचे अतिरिक्त पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, त्यानंतरही आरोपीने आक्रमक भूमिका कायम ठेवत एका पोलिस कर्मचाऱ्याला चापट मारल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी मनोज राजेश उईके याला अटक केली असून कौशल नगर येथील सुधाकर दत्तूजी तलवे (वय ६५) यांच्याविरुद्धही सरकारी कामात अडथळा, मारहाण, धमकी देणे आदी कलमांखाली गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.