
Image Source:(Internet)
मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना मध्यरात्री भूकंपाच्या मालिकेने पुन्हा एकदा हादरवले. काही मिनिटांच्या अंतराने आलेल्या सलग धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. झोपेत असतानाच अचानक जमीन हादरल्याने अनेकांनी घराबाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या (NCS) नोंदीनुसार, पहिला आणि सर्वाधिक तीव्र धक्का पहाटे 1.37 वाजता बसला. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.6 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पांग्रा शिंदे परिसरात, जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. या धक्क्यापूर्वी काही नागरिकांना जमिनीतून मोठा गडगडाट ऐकू आल्याचा अनुभव आला.
यानंतर पहाटे 2.15 वाजता 3.6 रिश्टर स्केलचा, 2.17 वाजता 3.9 रिश्टर स्केलचा आणि 3.23 वाजता आणखी एक सौम्य धक्का जाणवला. दुसऱ्या आणि तिसऱ्या धक्क्यांचे केंद्र काकडधाबा परिसरात असल्याची माहिती देण्यात आली.
अचानक आलेल्या या हादऱ्यांमुळे अनेक गावांमध्ये मंदिरांवरील ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना सतर्क करण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना घेऊन मोकळ्या जागेत धाव घेतली. अनेकांनी संपूर्ण रात्र घराबाहेरच काढली.
दरम्यान, याच महिन्याच्या 2 जुलै रोजीही हिंगोली परिसरात दोन भूकंप झाले होते. अल्पावधीत पुन्हा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भूगर्भातील नैसर्गिक हालचाली आणि पावसाळ्यात वाढणारा दाब ही या घटनांमागील संभाव्य कारणे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.